“माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्या खोऱ्यातील शिळा”
कुसुमाग्रजांच्या या ओळी प्रत्येक मराठी माणसाच्या मनातले भाव व्यक्त करतात. सह्याद्रीच्या कुशीत जे वाढलेत ते मराठी. कृष्णा, कोयना, भीमा यांचं पाणी ज्यांच्याशरीरात खेळतंय ते मराठी. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, हजारो वीर मावळ्यांच्या रक्ताने पवित्र झालेल्या हर एक पत्थरा पुढे ज्यांना नतमस्तक व्हावंसं वाटत ते मराठी. आणि कुठल्याही परिस्थितीत ज्यांचा कणा झुकत नाही आणि बाणा तुटत नाही ते मराठी.
शिक्षणा साठी किंवा नोकरी, धंद्या निमित्ताने मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला तरी मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि साहित्य यांबद्दल प्रत्येकाला जाज्वल्य अभिमान आणि उत्कट प्रेम असतं. याचं कारण म्हणजे त्याची मराठी मातीशी असलेली नाळ कधीच तुटत नाही. अशाच युटा आणि आसपासच्या परिसरा मध्ये राहणाऱ्या मराठी जनांना एकत्र आणण्यासाठी युटा मराठी मंडळाची स्थापना झाली. त्यात अनेक माणसं जोडली गेली आणि आता त्याचं जणू एक कुटुंबच झालंय. जर काहीकारणाने आपण युटा मध्ये आलात,आपण मराठी असाल किंवा मराठी भाषा, संस्कृती बद्दल आपल्याला आदर आणि उत्सुकता असेल तर युटा मराठी मंडळा मध्ये आपलं स्वागत आहे.