Site icon Utah Marathi Mandal

युटा मराठी मंडळ – मकर संक्रांत २०१८ वृत्तांत

मंडळाच्या नवीन कार्यकारिणीने कामाला सुरुवात केली आणि मकर संक्रांतीचा कार्यक्रम करायचं निश्चित केलं. पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे मंडळी उत्साहात होती. मग अनेक भेटी, अनेक चर्चा झाल्या, कार्यक्रम कसा करायचा, कुठे करायचा इथपासून ते अगदी वाण काय लुटायचं, सजावट काय करायची इथपर्यंत. बरेच आधी पासून तयारी चालू असल्यामुळे सगळं कसं अगदी सुरळीत चालू होतं. निमंत्रणं गेली, जेवणाचे पदार्थ ठरले, आणि त्यातच लहान मुलांसाठी खास काहीतरी हवं म्हणून बोरन्हाणाची कल्पना पुढं आली. सगळी तयारी झाली. २० तारखेला लवकर जमून सजावट करायचं ठरलं. १९ तारखेला दुपार पर्यंत कडक ऊन होतं आणि संध्याकाळी अचानक वातावरण बदललं जोरात बर्फवृष्टी चालू झाली…उद्या कसं होणार याची चिंता होती पण सगळी मित्रमंडळी तिळगुळ घ्यायला आणि द्यायला येणारच हा आत्मविश्वास पण होता.

ठरल्या प्रमाणे २० तारखेला हळूहळू सगळे जमायला लागले आणि वातावरण उत्साही होऊन गेलं. सुरुवातीला बोरन्हाणाचा कार्यक्रम करण्यात आला. सर्व बाल गोपाळांना औक्षण करून त्यांच्या डोक्यावरून चुरमुरे, रेवड्या, फुटाणे, चॉकलेट्स घालण्यात आले. डोक्यावरून पडत असलेला खाऊ बघून मुलांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खाऊ गोळा करण्यासाठी त्यांची उडालेली धांदल अगदी बघण्यासारखी होती.

या वर्षी मंडळात अनेक नवीन मंडळी जोडली गेली आहेत त्यांनी ओळख करून दिली. नवीन मित्रमंडळींच्या उत्साहाने तर कार्यक्रमात खूपच मजा आली.

कार्यकारिणीच्या ओळखी बरोबरच यावर्षीच्या काही नियोजित उपक्रमांची माहिती सर्व सदस्यांना देण्यात आली. मराठी शाळा, वाचनालय आणि त्रैमासिक या नवीन उपक्रमांच्या घोषणेला सर्वांनीच मोठी दाद दिली.

यानंतर स्त्रीवर्गासाठी खास आयोजित केलेला अगदी पारंपरिक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हळदी कुंकू आणि तिळगुळाच्या वड्यांना अस्सल मराठी उखाण्यांची साथ मिळाली आणि कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली. संक्रांतीचे वाण म्हणून मंडळाने पारंपरिक नथ लुटली.

खास महाराष्ट्रीयन पद्धतीच्याच भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेता घेता काही खेळही खेळले. कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरलं ते मिहीर गोडबोलेंच्या मदतीने तयार केलेली सजावट. कार्यक्रमाला अनुसरून झोपडी, त्यातील चूल, जातं, धान्याचं सूप फारच सुरेख झालं होत. सर्वांनीच त्याबरोबर छायाचित्र काढलं आणि दोघांचं हि खूप कौतुक केलं. एकंदरच कार्यक्रम खूप उत्तम रीतीने पार पडला. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्यासाठी सतत झटणारे कार्यकर्ते. या हि कार्यक्रमात अशा अनेक कार्यकर्त्यांची खूप मदत झाली. मेघा शिवेकर ने सर्व क्षण अतिशय सुंदर पद्धतीने कॅमेरा मध्ये टिपलेत. स्नेहल महाजन ने घेतलेल्या गमतीदार खेळांमुळे खूपच मजा आली. राहुल इप्पर आणि दिनेश चौधरी यांनी कार्यक्रमा दरम्यान खूप मदत केली. त्याच बरोबर कार्यक्रम संपल्यानंतरही अनेक लोकांनी थांबून सर्व आवरायला मदत केली, विजय, संतोष, नेताजी, कौस्तुभ, निखिल, संदीप धन्यवाद. अनवधानाने कोणाचा उल्लेख करायचा राहून गेला असल्यास क्षमस्व. सर्वांना खूप खूप धन्यवाद. पुढच्या कार्यक्रमात भेट होईलच.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला !!

Exit mobile version